
कधी शिक्षणासाठी, नोकरीसाठी आपलं हक्काचं गाव सोडलं आहे का? पोटाला चिमटा काढून कधी झोपला आहात का? कधी आयुष्यात असहाय्य झालं आहे का? आई-वडील आहेत, पण मदत करू शकत नाही आहेत. मित्र-मैत्रिणी हतबल आहेत. अन् नातेवाईक, कुठलीही कथा तर सुरूच त्या नातेवाईकांमुळे होते. आणि अशा परिस्थितीत तुम्ही एकटे लढताय, कल्पना करा….
एक भाकर तीन चुली, ही कांदबरी त्या महिलेवर आहे, जीनं न शिकताही सावित्रीबाई ओळखल्या, ही कादंबरी त्या महिलांसाठी आहे. सगळं काही असताना त्यांना प्रश्न पडतो, मी हे कसं करू. एक महिला, जिला हक्काचं घर नाही. तिला हक्काचं गाव नाही. हक्काचं माणूस आहे म्हणावं, तर तेही तिला सोडून जातं. कशी जगली ती, कुठल्या परिस्थितीत तिनं तीन चुलींवर भाकरी करण्याचा प्रयत्न केला. आपल्या समाजात असलेली जातीची उतरंड सांगितली जाते. त्या तथाकथित उतरंडित सगळ्यात खाली कुठली जात आहे माहिती आहे. ‘गरिबी’, गरिबी ही अशी जात आहे, कुठलाच धर्म, कुठलाच समाज तिला आपलसं म्हणायला तयार नाही. एका विधवा स्त्रीच, तिला आपल्या समाजात मिळणाऱ्या वागणुकीचं चित्रण करणारी ही कादंबरी
लेखकांविषयी
एक भाकर तीन चुली या कांदबरीचे लेखक आहेत देवा झिंजाड. झी मराठी या वाहिणीवरील हास्यसम्राट या विनोदी कार्यक्रमात स्पर्धक म्हणून ते सहभागी झाले होते. त्यांना २२ विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत. सध्या ते एका खासगी कंपनीत कार्यरत असून ‘सगळं उलथून टाकलं पाहिजे’ हा कविता संग्रह आणि ‘मेंदूची मशागत’ हा त्यांचा ललित संग्रह प्रसिद्ध आहे.
का वाचायचं हे पुस्तक?
सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी, आपल्या सारखं वाटत असतं, आपणचं मोठा संघर्ष करतोय. पण ही जरी कादंबरी असली, तरी यामुळे आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. विचार करायला गेलं तर आजही एकट्या स्त्रीला या समाजात जगणं तेवढंच अवघड आहे. जेवढं पूर्वी होतं. कायदे आहेत पण न्याय मिळत नाही. यासगळ्याचा विचार करायला लावणारं हे पुस्तक असून प्रत्येकानं वाचायला हवं.