
मुंबई-पुणे-मुंबई चित्रपट पाहिल्यानंतर ना पुण्यात कधी न आलेला पण पुण्याच्या प्रेमात पडतो. म्हणजे माझं असंच झालं. १२ वी नंतर जवळपास सगळे मित्र पुण्यातच गेली. त्यांच्याकडून पुण्याचे किस्से ऐकायल्यानंतर वाटायचं, यार आपल्याला पण जाता आलं असतं तर, पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट तुम्हाला याेग्य वेळा आली की मिळत असते. अगदी तसंच मला पदवीनंतर पुण्यात शिकण्याची संधी मिळाली. पण या शहराबद्दल जेवढं मला आकर्षण होतं, ते सगळं सुरुवातीच्या दोन-चार दिवसांतच संपू लागलं होतं. ओळखीचे नसलेले चेहरे, मेसचं जेवण, ती गर्दी या सगळ्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसात शहरातून परत गावाकडे जावं असं वाटायला लागलं होतं. पण मग…
सारस बाग…
पण मग, मग विचार केला आपण शिक्षणासाठी आलो आहे. आता थांबावं तर लागणारच. आणि मग मला कळालं की माझ्या खोलीपासून सासरसबाग अगदी हाकेच्या अंतरावर आहे. एक दिवस संध्याकाळी असंच एकटा फिरत-फिरत सारस बागेत गेलो. तिथली कमाल शांतता, सुंदर वातावरण अनुभवलं आणि ती जागाच कारण ठरली मला पुण्याच्या प्रेमात पाडण्यासाठी, सारस बागेत गेलं की स्वतःचीच ओळख स्वतःला नव्यानं होते. सारसबाग खोली जवळच असल्यामुळे मग मी तिथे नेहमी जायला लागलो. कधी पुस्तक घेऊन, तर कधी आवडती गाणी ऐकायला, पण सारसबाग दरवेळी कमाल अमुभव द्यायची. महत्वाचं म्हणजे या धावपळीच्या जगात ते माझा विचार करण्यासाठी मला वेळ द्यायची. पण एवढा निवांतपणा मी सारसबागेतच अनुभवला. अन् मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटात पाहिलेली सारसबाग आता प्रत्यक्ष पाहतो. हे तर आणखी भारी वाटायचं. त्यामुळेच आता पुणं सोडलं असलं तरी, जेव्हा जेव्हा पुण्यात जातो तेव्हा सारसबागेत शांतता अनुभवायला आणि तिथली जगात भारी भेळ खायला नक्की जातो.

