
आज स्वातंत्र्यदिन, कधीकधी वाटतं यार उगाच मोठे झालो ना. कारण स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लहानपणीचा उत्साह कमाल असयचा. म्हणजे मला तर १५ ऑगस्टपेक्षाही….१४ ऑगस्टची फार गंमत वाटायची. ये भाई पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असतो म्हणून नाही काही….तर आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारी करण्याची मजाच वेगळी होती म्हणून. १४ ऑगस्टला आमच्या शाळेत गणवेश नसला तरी चालायचा, मग रंगबिरंगी कपड्यातली सगळी मुलं काही ना काही तरी काम करत असायची. कोणी मैदीन साफ करत असायचं, कोणी ध्वजारोहणाचा तो खांब साफ करत असयचा, तर कोणाची वादणाची प्रॅक्टीस सुरु असायची. मला काम आवडायचं ते पताके लावण्याचं. केसरी, पांढरा आणि हिरवा असे एका रांगते ते लावत जायचे. पण जर का यातला क्रम चुकला तर जी काही आपण जणू देशद्रोह केला अशी भावना निर्माण व्हायची ना, ती शब्दात न मांडता येणारी.

पण खरंच गंमत होती. सकाळा उजेडायच्याआधी उठायचं, आदल्यादिवशी आईने छान धुतलेला, कडक इस्त्री मारलेला तो पांढरा शर्ट कपाटातून काढायचा, त्याची इस्त्री मोडायची आणि त्या खाली खाकी पॅन्ट… तुम्हाला सांगतो, हा आमच्या शाळेचा गणवेश पण त्यावेळी पोलीस किंवा आर्मीच्या वर्दीसारखाच वाटायचं बरं…मगनंतर मित्रांसोबत शाळेत जायचं, आपल्या तिरंग्याला दिलेली ती सलामी, एनसीसी वाल्यांची परेड किती भारी वाटायचं ते सगळं, पण आता शालेय जीवन संपल आणि स्वातंत्र्यदिनापेक्षा त्यादिवशी ऑफिसला सुट्टी असते म्हणून त्या दिवसाशी वाट बघू लागलो.
असो आठवणीतल्या स्वातंत्र्यदिनाच्या तुम्हाला शुभेच्छा!