
हिंदू सणांपैकी एक लुप्त होत असलेला सण…म्हणजे बैलपोळा. शहरात सगळ्या सणांचे इव्हेंट झाले. देशभरातून अनेक लोक, ब्लॉगर दहीहंडी, गणेशोत्सवाचे सण नव्हे तर इव्हेंट पहायला मुंबई, पुण्यासारख्या शहरात येतात. पण पोळा या सणाचा इव्हेंट होऊ शकला नाही. का? कारण हा सण शेतकऱ्यांचा आहे. हा सण बैलांचा आहे. हा सण त्या लोकांचा आहे. जे लोक जगले काय अन् मेले काय सरकारलाच काय कोणाला काही फरक पडणार नाही. अशा लोकांचा हा सण, या सणापासून निसर्गाची काही हानी होणार नाही. या सणामुळे, कोट्यवधींची उलाढाल होणार नाही. मग तुम्हीच सांगा कसा या सणाचा इव्हेंट होणार. असो…

हा सण विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. वर्षभर राबराब राबलेल्या आपल्या बैल जोडीला वर्षातून एक दिवस आराम देण्याचा हा दिवस. आदल्या दिवशी गोठ्यात जायचं, बैलांची खांदेमळन करायची, त्यांना उद्याचं म्हणजे पोळ्याच्यादिवशीचं जेवणाचं आमंत्रण द्यायचं, ते आमंत्रण पण एका खास पद्धतीनं द्यायचं, बैलांच्या कानात सांगयच, ‘आज आमंत्रण उद्या जेवायला या होsss’ आणि पळी, संध्यापात्रावर वाजावायची. मग पोळ्याच्यादिवशी सकाळीचं ओढ्यावर बैलजोडी धुवायला न्यायची, आपल्या हातानं त्यांना घासायचं…आणि नंतर त्यांना सजवायचं, घुंगरू, गोंडे, झुल अशा कित्येक साहित्यानी एकाद्या नव्या नवरीसारखं त्यांना सजवायचं, अन् थाटात त्यांना गावातून मिरवूण, शिवशंभोच्या दर्शनाला न्यायचं, हे सगळं झालं की त्यांची पुजा करायची, ही फक्त पुजा नसते, तर ही शेकऱ्यानी बैलाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असते. वर्षभर तू साथ दिली, पण मी कधी चुकलो असेल तर माफ कर, असं म्हणणारी ही भावना असते. त्यादिवशी पुरणपोळी बैल खातात पण समाधानाचा ढेकर मात्र बळीराजा देत असतो.
असा हा फक्त खेड्यापुरता मर्यादित राहिलेला, कोट्यवधींची उलाढाल नसली तरी सगळ्यात श्रीमंत असा हा सण एकदा तरी अनुभवा, तो जपता आला तर नक्की जपा. कारण तो सण जर जपला नाही ना तर पुढच्या पिढीला ‘एक होता पोळा नावाचा सण’, फक्त ही गोष्ट सांगावी लागेल.
बैल पोळ्याच्या शुभेच्छा!