
काल गावातल्या मित्राचा कॉल आला. त्याला म्हंटलं कशी चालू आहे गावात गणपतीची तयारी? तो कॉलवर बोलत होता, पण माझं मन सगळं लहानपणीच्या आठवणीत गुंतलं होतं. चौथीत असताना चार मित्रांनी मिळून गणपती मांडायला सुरुवात केली होती. घरासमोरच्या वरांड्यातच, फार मोठा मंडप नाही. वर्गणी दिली तितकीच घ्यायची आणि ठरलेल्या बजेटमध्ये सगळं गणित बसवायचं. मोठा प्रसाद नाही, डीजेवैगरे तर १२ वर्षाच्या मंडळाच्या कारकिर्दीत कधी लावलाच नाही. एखाद्या कुठल्या मित्राकडून छोटा स्पिकर आणायचा त्यावर दिवसभर पार्वतीच्या बाळा गाणं वाजणार, मग गणपती बसल्याच्या पहिल्यादिवशी आरतीचे दिवस वाटून घ्यायचे, प्रत्येकाकडे काहीना काही जबाबदारी असायची, एक जण स्वच्छतेचं बघणार, एकानी आरतीसाठी गल्लीतल्या सगळ्यांना बोलावून आणायचं, दुसऱ्यानं प्रसाद वाटायचं अशा सगळ्या कामाचं व्यवस्थित नियोजन करायला आम्हाला गणपती बाप्पानं शिकवलं.

पण हे मुलांना तोवर शिकणं शक्य होतं जोपर्यंत मंडळ होती. आता मंडळं गेली आणि ट्रस्ट आली अन् सणांना व्यावसायिक रूप प्राप्त झालं. वर्गणी देणारे गेले आणि स्पॉन्सर आले, आणि आता तर वर्गणीपेक्षा खंडणीच मागितली जाते. परवा पुण्यात एका आईस्क्रिमच्या दुकानाबाहेर उभा होतो. एक मंडळ नाही तर ट्रस्ट वर्गणी मागयला आलं होतं. त्यांनी दुकानदाराला आकडा सांगितला, दुकानदार म्हणाला तेवढे शक्य नाही, त्यातला एक गणेशभक्त नाही तर बाप्पाचा फॅन म्हणाला मागितली तेवढी वर्गणी दे, नाही तर वर्षभर तुझ्या दुकानासमोर धिंगाणाच घालतो. काय आनंद झाला असेल नाही बाप्पाला?
जाऊद्या त्यावर लिहिण्यासारखं खूप काही आहे. तो वेगळा विषय, पण बाप्पा, मंडळ आणि ते गणपतीचे ते १० दिवस खूप शिकण्यासारखे असतात. मला ना जॉब इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला होता. कधी कुठल्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे का? चौथीत असल्यापासून गणपती मांडायला सुरुवात केली. ते बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षापर्यंत गणपती मांडला. पहिल्या वर्षी २ हजाराचं बजेट होतं. ते शेवटच्या वर्षापर्यंत २० हजारांवर गेलं. पण ते वाढतं बजेट आमचं मॅनेजमेंट स्किल वाढवत होतं. आरतीसाठी किती लोक येणार, किती प्रसाद लागणार, आयुष्यात पेपरचं कधी टेन्शन घेतलं नाही आम्ही पण शेवटच्या दिवशीच्या नियोजनाचं टेन्शन यायचं, आज एका दिवसात एवढीएवढी वर्गणी जमा करायची, ही मनाशी बांधलेली गाठ, टार्गेट पूर्ण करणं काय असतं हे आम्हाला शिकवून गेली. प्रत्येकाला दिलेली कामाची जबाबदारी आम्हाला टीमवर्क काय असतं ते शिकवून गेली. ठरलेल्या वेळी आरती करण्यानं आम्हाला वेळ पाळणं शिकवलं. यासारखं खूप काही आम्हाला लहानपणी बाप्पा आणि आमचं मंडळ शिकवून गेलं. म्हणूनच जर आजच्या काळातही तुमचा मुलागा मंडळात जात असेल, तर बिनधास्त जाऊ द्या, वेगळे कुठले सॉफ्टस्किल शिकण्याची गरज पडणार नाही. फक्त ते गणेशभक्तांच मंडळ असावं, बाप्पाच्या फॅन्सचं ट्रस्ट नसावं.