माझी डायरी

boy who are writing

व्यक्त व्हायलाचं हवं

लहान असताना मला एक गोड सवय होती, शाळेतून आल्यावर नाहीतर, रात्री जेवतांना आज दिवसभरात कायकाय झालं याचा पाढा वाचून दाखवण्याची. पण जसं-जसं मोठा होत गेलो, शाळा ही सुटत गेली आणी त्याच सोबत ती सवय ही, पण आवश्यक असतं असं कुठे तरी, कोणा जवळ व्यक्त होता येणं.

पण आज कोणाकडे सुख-दुखः समजुन घ्यायला तर वेळ नाहीचये, पण दोन शब्द बोलायला देखील वेळ नाही. पण मग मनाची होत असलेली घालमेल, विचारांचा झालेला कोंडमारा आणि मनात साचलेला गाळ ओकायलाच हवा. पण कुठे? मी सोशल मिडीया वरती एक छान वाक्य वाचलं होतं. ‘मनाची जखम कोणा जवळ व्यक्त करतांना विचारपूर्वक करा, कारण जखमेचं औषध असेलच असं नाही, पण मीठ मात्र प्रत्येक घरात असतं’ आणि आजच्या काळात खरचं भीती वाटते कुठे ही व्यक्त व्हायला, म्हणूनच मी माझ्या डायरीशी बोलत असतो, म्हणजे डायरी लिहीत असतो.

त्याच काय झालं, एक दिवस मी सहजच जुने फोटो, काही सेव्ह केलेले स्नॅप पाहत बसलो होतो. जुन्या आठवणी, मित्रांसोबत घालवलेले काही अविस्मरणीय क्षण ते पाहून मला खूप भारी वाटलं, पण प्रत्येक क्षण हा कॅमेरात कैद करता येत नाही, काही आठवणीतचं साठवावे लागतातं, म्हणूनच एक छान सवय मी लावून घेतली. डायरी लिहीण्याची, जगलेले सुंदर क्षण साठवण्याची. मनासारखं घडलं ते जपण्याची, नको असलेलं विसरण्याची आणि आपल्याला नेमकं हवं तरी काय? ते शोधण्याची.

तुम्हाला एक गंमत माहितीये का?आपल्याकडे दुःखी होण्यापेक्षा आनंदी होण्याचे खूप कारणं असतात. पण आपण फोकसचं चुकीच्या ठिकाणी करतो. म्हणजे आपण आनंदा पेक्षा दुःखाकडेच लवकर आकर्षीत होतो. आपल्याकडे काय आहे यापेक्षा काय नाही याचाच विचार आपण अधिक करत असतो. पण जर ही सवय बदलायची असेल तर डायरी लिहायला हवी.

‘का’ लिहायची डायरी?

कुठलही काम आपण त्यातला ‘का?’ कळाल्या शिवाय करतच नाही. आणि एकदा का आपला का कळाला की ते काम करण्यात देखील वेगळीच मजा येते. डायरी लिहीण्यामागचा माझा ‘का’ होता मला जगलेले क्षण पुन्हा आठवणीत जगायला आवडतात. पण प्रत्येकाचा ‘का’ हा वेगळा असू शकतो.

पण डायरी लिहीण्याने काय होते ते सांगायचे झाल्यास, सगळ्यात महत्वात भावनांची सांगड घालता येते. आपल्या विचारांवर, आपल्या कल्पनांवर ताबा मिळवत विचाकप्रक्रियेत स्पष्टता मिळवता येते. दिवसभरात आपला वेळ अनावश्यक तर कुठे खर्च झाला नाही ना याची चाचपणी करता येते. याच सोबत उद्याचं नियोजन करणं देखील सोप्प जातं. आता यातला नेमका तुमचा ‘का’ कोणता याचा शोध तुम्हीच घ्यायला हवा. पण ‘का’ काही असो, डायरी लिहायलाच हवी.

पण मग लिहायची कशी?

आता तुम्ही म्हणाल येवढं सगळं तर सांगीतलं पण डायरी लिहायची कशी तेच नाही सांगीतलं, थांबा थांबा सांगतो. आता ज्या प्रमाणे डायरी लिहीण्या मागचा प्रत्येकाचा ‘का’ वेगळा असू शकतो अगदी त्याच प्रमाणं प्रत्येकाची डायरी लिहीण्याची पध्दत देखील वेगळी असूच शकते. मात्र डायरी लिहीण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, ती म्हणजे डोक्यातलं डायरीत उतरवतांना शक्यतोर सकारात्मक विचार उतरवण्याचाच प्रयत्न करावा.

बघा म्हणजे कसं, डायरी लिहीतांना फक्त तुम्ही आज दिवस भरात काय-काय सकारात्मक बाबी झाल्या तेच लिहू शकता, तसेच उद्याच्या दिवसात तुम्हचे काय महत्वाचे प्लान आहेत हे तुम्ही आदल्या दिवशी लिहील्याने योग्य नियोजन करण्यास मदत होते.यात अजून एक महत्वाची पद्धत म्हणजे, तुम्हाला तुमचा दिवस कसा घालवायचा आहे किंवा पुढच्या कालावधीत तुम्ही स्वतःला कुठे बघता हे कल्पणा करून कागदावरती उतरवणे. ही देखील डायरी लिहीण्यची खूप प्रभावी पध्दत आहे. तर मग आजपासून डायरी लिहायला सुरूवात करा आणि आपल्या विचारांना दिशा देण्याचं, स्वतःला शिस्त लावण्याचं काम करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *