
राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत सध्या महापालिका निवडणुकांची चर्चा आहे. सुरुवातीला कोणाला तिकीट मिळणार इथपासून सुरू झालेला राड, नंतर उमेदवार पळवण्यापर्यंत आला. कोणता पक्ष कोणत्या महापालिकेत कोणासोबत नांदत आहे. हे त्या त्या पक्षाच्या अध्यक्षांना जरी माहिती असेल, तर जनतेचं नशीबच म्हणावं लागेल. अशी परिस्थिती राजकीय पक्षांनी निर्माण केली आहे. स्वच्छता,पाणी, प्राथमिक शिक्षण या मुद्द्यांवर लढायची निवडणूक राजकीय पक्ष हिंदू-मुस्लीम, मराठी-अमराठी म्हणून लढवत आहेत. आणि इथंच ही निवडणूक भरकटली असं म्हणू शकतो.
मुळात नगरसेवक ही बेडकासारखी जमात आहे. बेडूक जसे पावसाळ्यातच बाहेर येतात, अगदी तसेच नगरसेवक निवडणुका आल्या रे आल्या की बाहेर दिसायला सुरुवात होते. त्यामुळे नगरसेवक मराठी आहे, हिंदू आहे की आपल्या जातीचा आहे यापेक्षा तो माणूस म्हणून कसा आहे हे महत्त्वाचं ठरतं. पण असो, काही दिवसांपूर्वी एक बातमी होती. मुंबईतील माजी नगरसेवकांच्या संपत्तीत पाच ते सात पटीनं वाढ झाल्याची. या संपत्ती वाढलेल्या नगरसेवकांमध्ये मराठी मतांवर निवडून आलेले नगरसेवक होते. हिंदू म्हणून निवडून आलेले नगरसेवकही होते. त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ नगरसेवकांमध्ये असलेली समाजसेवेची तळमळ दाखवते.
असो, आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक परिस्थितीवर, स्थानिक प्रश्नांनुसार पॅनल स्थापन करू लढवल्या जात होत्या. पण अलिकडच्या काळात या निवडणुका पक्षांच्या चिन्हावर लढवल्या जाऊ लागल्या आणि तिथेचं या निवडणुकांना नको तितकं महत्व प्राप्त झालं. अन् महत्त्वाचे मुद्दे बाजूला पडू लागले.
राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणुका होत आहेत. पण पहायला गेल्यास सगळीकडे पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि चांगल्या रस्त्यांचा अभाव याच समस्या आजही कायम आहेत. मात्र मुंबईत आम्ही लढतो आहोत, भाषेच्या मुद्द्यांवर, पुण्यात लढतो आहोत नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये घशाला कोरड पडली तरी आम्ही ओरडून ओरडून शहराच्या नावाच्याच मुद्द्यावर बोलतो आहे. आता हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेतच, पण याच मुद्द्यांच्या भोवती निवडणुका व्हाव्या एवढे महत्त्वाचे तर नक्कीच नाही.
मुळात महापालिका निवडणुकातून निवडून येणाऱ्या नगरसेवकांची कामं काय? याची कल्पनाच पूर्णपणे मतदारांना नसल्यानं निवडणुका अशा भरकटल्या जातायत. जाहीरनाम्यात नगरसेवकांच्या अखत्यारीत नसलेल्या बाबींची आश्वासन दिली जातायत. मराठीत एक म्हण आहे “अंथरून पाहून पाय पसरावे” पण या पलिकेत पुढाऱ्यांनी मतदारांचे पाय पकडत अशक्य अशा घोषणांचं अंथरून त्यांच्या पुढे पसरलं आहे. त्यामुळे सुजान बना, सूज्ञ व्हा, सजग रहा आणि हाकेला ओ! देणाऱ्या माणला निवडून द्या.(असा माणूस मिळनं अशक्य आहे) त्यानी दिलेली आश्वासन त्याच्याचकडून पूर्ण करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. पण मतदान करा आणि आपला हक्क बजावा.