
विरोध करावा विचारांना, विरोध करावा चुकीच्या गोष्टींना, पण तथ्य समजून न घेता विरोध करणं म्हणजे हवेत गोळीबार करण्यासारखं आहे. रावणाच्या लंकेतही विभीषण असतोच की, म्हणून हिंदी पत्रकारिता आणि मराठी पत्रकारिता यात जमीन आस्मानाचा फरक आहे. असं मी म्हणणार नाही पण हिंदी पत्रकारिता पूर्णपणे व्यवसाय झाला असून मराठी पत्रकारितेनं अजून तरी आपली मूल्य जपली आहेत. एक पोलीस आंदोलक विद्यार्थ्यांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देतो. या प्रकरणाचंं गांभीर्य त्या तरुणांना त्यावेळी कळत नाही. पण मराठी माध्यमांना हे गांभीर्य लक्षात येतं. बातमी लावून धरली जाते आणि अवघ्या काही तासात मुख्यमंत्र्यांना स्वतः त्या प्रकरणाची दखल घ्यावी लागते.
अशी एक नाही मराठी पत्रकारीतेच्या सन्मानाची अनेक उदाहारणं देता येतील. पण माध्यमांचं हे महत्त्व आजच्या पिढीला कळणं थोडं अवघड आहे. कारण त्यांचा विश्वास सोशल मीडियावर आहे. हरकत नाही. पण माध्यमांची ही अवस्था होण्यात किंवा सो कॉल्ड गोदी मीडिया होण्यात जेवढी माध्यमं जबाबदार आहे. तेवढीच जनता देखील.
आम्हाला फुकट पण हवं आणि पौष्टीक पण
साधारण १० पानांचं रोज प्रसिद्ध होणारं वृत्तपत्र. पाच ते सहा रुपयांना ते विकलं जातं. तरी त्याचा खप मेलोडी चॉकलेटपेक्षाही कमी आहे. वास्तविकता त्याची प्रिंटिंग किंमत २० ते २५ रुपये असेल. पण तेवढ्या रुपयात ते विकत घेण्याची जनतेची मानसिकता आहे का? नक्कीच नाही, मग हा फरक भरून काढण्यासाठी माध्यमांना जाहिराती घ्याव्या लागतात. त्या जाहिराती मिळतात सरकारकडून, मोठमोठ्या उद्योगांकडून आणि इथेच तडजोड करावी लागते, पत्रकारितेच्या मूल्यांशी. हा झाला वृत्तपत्राचा खर्च, टीव्ही माध्यमांचा खर्च आणि ताकद दोन्ही कल्पनेच्या पलीकडची आहे. जर जनतेनं वृत्तपत्र २५ रुपयांना खरेदी करण्याची तयारी दाखवली आणि चॅनल बघण्यासाठी पैसे मोजण्याची तयारी दर्शवली तर भारतीय माध्यमांचा १५७ वा रँक १ वर यायला फारसा वेळ लागणार नाही.

आता हे सगळं बोलण्याची वेळ आली कारण, आंदोलक तरुणांनी दिल्ली संस्कृती मुंबईत रुजवण्याचा प्रयत्न केला. एका वृत्त वाहिनीच्या रिपोर्टरला कर्तव्यावर असताना एका घोळघ्यानं घेरून गोदी मीडिया, लूझर अशा शब्दात अपमानीत केलं. तरी त्या व्यक्तीनं शांतपणे सगळं सहन केलं. आता या तरुणांना कल्पना पण नसेल त्यांनी केवढा मोठा गुन्हा केला. पण हा गुन्हा माफ करण्यासारखा नाही. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नक्कीच व्हावा, ती आता सगळ्याच माध्यम प्रतिनिधींची इच्छा आहे. पण त्याच सोबत मुंबईत एका जेष्ठ पत्रकाराशी झालेल्या गैरवर्तनाप्रकरणी फोटोतील प्रत्येकावर कारवाई व्हायलाच हवी. या पिढीनं सरकारला धाक दाखवला त्याचं कौतुकच पण यांना कायद्याचा धाक रहायलाच हवा. कारण कोण गोदी मीडिया, कोण विकाऊ आणि कोण दलाल हे ठरवण्याचा अधिकार यांना कोणी दिला?. अन् या तरुणांचं जेवढं वय नसेल ना त्यापेक्षा जास्त वर्षांचा डाटा मीडियाकडे स्टोअर आहे. त्यामुळे भान विसरलेल्या पिढीला, सोशल मीडियाच सर्व काही समजणाऱ्या पिढीला, मीडियाची ताकद कळायलाच हवी. आणि हो, मराठी मीडिया अजून जिवंत आहे.
-विनय महाजन