सीजेपी, पंजाब, जेन झी आणि भाजप

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानं देशातील राजकारणाला एक नवं वळण मिळालं आहे. १२ वर्षांच्या मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होऊन देखील एकाही मंत्र्यांचा राजीनामा घेता न येणं, हा विरोधकांचा एक प्रकारे पराजयच होता. मात्र आता सीजेपीच्या जंतर मंतरवरील आंदोलनानं विरोधकांच्या या पराजयावर पांघरून घालण्यात यश आल्याचं म्हणावं लागेल. पण आता प्रश्न एवढ्यावरच थांबणारा नाही आहे. 

२०२७ ला पंजाब विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. पंजाब हे राज्य भाजपच्या विशलिस्टमधलं एक, इथं भाजपला अजूनही कमळाची कळीही उगवता आलेली नाही. त्यासाठी भाजप दुसरी फुलं आणून म्हणजे राघव चढ्ढा, संदीप पाठक यांना पक्षात घेऊन आपली बाग फुलवण्याचा प्रयत्न करत आहे. अशात भाजपला धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यामुळे आणखी एक आयतं कोलीत मिळालं असं म्हणता येईल.

पेपर फोडता पंजाब

यावर्षी पंजाबमध्ये देखील पेपरफुटीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला.एकीकडे ड्रग्जचा मुद्दा तापलेला असतानाच फार्मसी ऑफिसर भरतीचा पेपर फुटल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं. आता अभिजीत दिपकेंच्या सीजेपीनं जंतर मंतरवरील आंदोलन हे फक्त नीटचा मुद्दा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी असल्याचं सांगितलं. मात्र दिपके आणि सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांकांचं आम आदमी पार्टी कनेक्शन जगजाहीर आहे. त्यासोबतच त्यांच्या या आंदोलनात अनेक डाव्या विद्यार्थी संघटना आणि डाव्या पक्षांनीही पाठिंबा दिला. पण जर हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी आणि पेपरफुटी विरोधात होतं, तर सीजेपीनं पंजाबमध्ये देखील हा मुद्दा उचलून धरावा ही मागणी आता जोर धरते आहे. तसं झालं नाही तर एक प्रकारे हे आंदोलन विद्यार्थ्यांचं नसून राजकीय असल्याचा प्रचार भाजपकडून केला जाईल.

आंदोलनामुळे भाजपपासून जेन झी दुरावले  

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नवमतदार भाजपकडे आकर्षीत झाल्याचं बोललं गेलं. मात्र या विद्यार्थी आंदोलनात ज्यांच्या आई वडिलांनी वर्षानुवर्ष भाजपला मतदान केलं ते पण सहभागी झाल्याचं बोललं गेलं. त्यामुळे या मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्याचं मोठं आव्हान भाजप समोर असेल. पण भाजप आव्हान स्वीकारणारा पक्ष आहे. आत्मपरीक्षण करणं भाजपला चांगलं जमतं. पंतप्रधानांनी स्वतःला इन्स्टा-प्री करणं, तरुणांना आपलसं वाटावं म्हणून फ्रेंन्ड म्हणून केलेला संवाद, हे सगळं भाजप किती लवकर कामाला लागतं, हे दर्शवणारं आहे. “ही पिढी प्रश्न विचारणारी आहे. यांच्याशी संवाद साधण्याची पद्धत बदलायला हवी” सरसंघचालक मोहन भागवतांचं हे वक्तव्य, भाजप आणि संघानं आत्मपरीक्षण करायला घेतल्याचं लक्षण आहे. असं म्हणावं लागेल. त्याचसोबत आंदोलनात सहभागी झालेली पिढी ही कुठली राजकीय विचारधारा घेऊन उतरली नव्हती. इन्स्टाग्रामचं अल्गोरीदम बदललं की मत बदलणारी ही पिढी आहे. याचा अभ्यास भाजप नक्कीच करेन, त्यामुळे मिशन जेन झी भाजप कशाप्रकारे हाताळतं हे पहानं आता महत्वाचं ठरणार आहे. 

– विनय महाजन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *