
मी तुमच्या राज्यातील एक मराठी तरुण बोलतोय.नाही आम्हाला सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार कधीच हिरावून घेण्यात आलाय. हे लक्षात आलंय माझ्या, नाही तर उगाच का? विद्यार्थ्यांची व्यथा मांडणाऱ्या पत्रकार मंदार गोंजारींवर पुण्यात गुन्हा दाखल झाला. असो, म्हणून प्रश्न न विचारता भावना व्यक्त करीन म्हणतोय.
मुख्यमंंत्री महोदय या मराठीनं तुम्हाला एक साधा नगरसेवक ते मुख्यमंत्री केलंय. ही मराठी माझ्यासारख्या कित्येकांना पोसते, ती बोलता येते, लिहिता येते म्हणून आमची नोकरी आहे. तुमच्यासारख्या राजकारण्यांना झाली असेल सवय आई-बहिणीवरच्या शिव्या पचवून घेण्याची. पण आम्हा सामान्यांना नाही. ही मराठी आमची आई आहे. अन् कोणी परप्रांतियानी यावं आणि आमच्याच महाराष्ट्रात आम्हाला म्हणावं, “ज्या नहीं बोलता मराठी” आई शप्पत, अशी एक तीव्र सनक डोक्यात जाते काय सांगू. मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला तुमच्या राज्यातल्या नागरिकांना “लहानपणापासून हिंदी शिका” हे सांगण्याती हिंमत येते, मात्र त्या रिक्षाचालकांना तुम्हाला तोडकं- मोडकं का होईना, पण मराठी आलंच पाहिजे. असं ठणकावून सांगता येत नाही. याची मराठी माणूस म्हणून मलाच लाज वाटते.
मुख्यमंत्री महोदय मला कळतेय तुमची अडचण, तुम्हाला, तुमच्या पक्षाला पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. कदाचित पंतप्रधानपदाची महत्वकांक्षाही तुमच्या मनात असेल, पण त्यासाठी तुम्ही मराठी माणसाचा केलेला अपमान न विसरण्यासारखा आहे. सावरकरांचं एक वाक्य आहे. “अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळालं तरी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन” आता मी तुम्हाला सावरकर काय सांगावे, पण हाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन तुम्हीही म्हणाला असता, “माझ्या मराठीचा अपमान सहन करून पंतप्रधानपद जरी मला मिळणार असेल तर ते लाथाडून मी माझ्या मराठीचा स्वाभिमान जपेन” त्यादिवशी तुम्ही आमच्यासाठी पंतप्रधान झाला असता.

असो, बेसिक मराठी शिकायचीच असेल तर मला वाटतं एक आठवडा पुरेसा आहे. पण इथं पंधरा-वीस वर्ष राहून मराठी न शिकलेला भैय्या एका वर्षात चांगली मराठी शिकेल हा तुमचा गोड गैरसमज ठरू नये ही अपेक्षा. एक वर्षाची तुम्ही मुदत वाढ दिलीच आहेत तर भैय्याला एवढी चांगली मराठी यायला हवी, की रस्त्यात अडवून मराठी महिने विचारले तरी त्यानं फटाफट सांगावे, अन्यथा हा मराठी माणूस तुमचं पंतप्रधानपदाचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही.
-संतापलेला, वैतागलेला मराठी माणूस