
तुम्ही फक्त शिकलेले असून उपयोग नाही तुम्ही सवरलेले देखील असायला हवे. नाशिकचा कोण एके भोंदू बाबा तो २०० कोटींचा मालक होतो. बरं एवढ्यावरच न थांबता राज्यातील डझनभर मंत्र्यांना स्वतःपुढे नतमस्तक व्हायला लावतो. आणि हेच मंत्री इकडे महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आम्ही कसा जपतो याच्या टिमक्या मारत फिरताना दिसतात. याच निमित्तानं…
धर्म जपावा, धर्मांध तयार न करता…
अशोक खरातसारखे भोंदू ढिगानं तयार होतात, कारण आपण प्रश्न विचारायलाच घाबरतो. याची सुरुवात कुठून होते सांगतो. लहानपणी आपल्याला सांगितलं जातं, रात्री नखं कापू नये, अमुकअमुक वार असताना केस कापू नये. पण असं का? हा प्रश्न विचारण्याची गरजच तेव्हा आपल्यापैकी अनेकांना वाटत नाही आणि आपल्या प्रश्न न विचारण्याच्या सवयीमुळेच असे भोंदू बाबा तयार होतात. आणि आपल्याला उगाच वाटणाऱ्या भीतीचा फायदा घेतात, बरं हिंदू धर्मातील सगळ्यात पवित्र ग्रंथ भगवद् गीतेची निर्मीतीच प्रश्न विचारल्यामुळे झाली आहे. याचाच अर्थ आपला धर्म आपल्याला समोरच्याला प्रश्न विचारण्याची मुभा देतो. अन् प्रश्न विचारत राहिल्यानं धर्म जपला जातो आणि आपलाच धर्म समजून घेता येतो. तसंच जर मनात प्रश्न पडत राहिले, तर कुठल्याच ‘ओश्नो’ जलची गुंगी माणसाला चढत नाही आणि समोरच्यानं कितीही सांगितलं की “मागच्या जन्मी तू माझी राधा आणि मी तुझा कृष्ण होतो” तरी आपल्यातली दुर्गा, महाकाली ही जागी करता येते. फक्त जर धर्मानं सांगितलेलं मनाला पटत नसेल तर हिमतीनं प्रश्न विचारा आणि देव शोधताना, स्वतःला हरवू नका म्हणजे असे भोंदू तयारच होणार नाहीत.
दुसरी महत्त्वाची बाब, हिंदू धर्म कधीच कोणावर कशाच प्रकारची बंधनं घातल नाही. तुम्हाला देव शोधण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही. तुम्हाला कोणत्या बाबाबुवाची गरज नाही, मग असं असताना धर्माच्या नावाखाली असे प्रकार होणं फार गंभीर आहे. बरं समोर आलेला सगळा प्रकार नाशिक जिल्ह्यातला, याच नाशकात पुढच्यावर्षी कुभंमेळा होणार आहे. कुंभमेळ्यासाठी राज्यसरकारकडून मोठं नियोजनही करण्यात आलंय. पण या कुंभमेळ्यातून अशा भोंदूंना खातपाणी घातलं जाऊ नये अशीच एक देवभक्त म्हणून माझी प्रामाणीक इच्छा आहे. बाकी खरातची वरात अजून कुठपर्यंत जाऊन पोहोचते हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.