

माझा जन्म विदर्भातला, माझं गाव तर अगदी विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरच. लहानपणी मी निसर्ग म्हणजे सुकलेली झाडं आणि वाळलेली पिकं या पलीकडे काही पाहिला नाही. आठदिवसा आड पिण्यासाठी मिळणारं पाणी, आटलेले तलाव आणि विहीरी यापलीकडे फार काही पाहिलं नाही. विदर्भ, मराठवाड्यात डोंगरदऱ्या, निसर्ग नाही अशातला भाग नाही. पण जो निसर्ग कोकणाला लाभलाय, ज्या प्रकारे तो तिथल्या लोकांनी जपलाय, तो निसर्ग विदर्भ मराठवाड्यात नाही.
मी आजच्या तारखेपर्यंत कधीच कोकणात गेलो नाही. जाण्याची प्रचंड इच्छा आहे. पण कधी योग आला नाही. पण आता ती इच्छा ‘दशावतार’ चित्रपट पाहिल्यानंतर आणखी तीव्र झाली. हा चित्रपट कोकणातल्या माणसाने तर पहायलाचं हवा, पण हा विकासाच्या नावाखाली स्वतःचं भविष्य अंधारात लोटणाऱ्या प्रत्येक मंत्री, आमदार, नगरसेवक, सरपंच आणि निसर्गास ऱ्हास होताना दिसत असतानाही गप्प राहणाऱ्या प्रत्येकानं बघायला हवा.
काय आवडलं चित्रपटातलं…
चित्रपटाची कथा म्हणाल तर याआधीही अशा अनेक कथा आल्या आहेतचं , जंगलाच्या रक्षणासाठी कोणी प्राण गमावले वैगरे, पण यावेळी विशेष होतं ते म्हणजे कथा मांडण्याची पद्धत. लोकांशी जोडला गेलेला दशावतार, आपल्या जंगलाच्या, निसर्गाच्या रक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी राखनदार सक्षम आहे. ही कोकणातील लोकांची भावना. हे सगळं खूप भारी पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. चित्रपटातली गाणी कोकणी माणसाला जास्त कनेक्ट होणारी आहेत. कारण ती ओठांवर फार गुणगणली नाही.
मला जोडणारा धागा…
चित्रपटाची कथा तुम्हाला इथं सांगत नाही. पण ना, माधव नावाचा एक मुलगा असतो. त्याला आई नसते, वडिलांनीच लहानचा मोठा केला. चांगला शिकला वैगरे पण, नोकरी नाही. का? कारण राहतो त्या स्थानिक भागात रोजगार नाही आणि नोकरीसाठी शहरात गेल्यावर, गावाकडे म्हाताऱ्या बापाकडे कोण बघणार? हा माधव समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न.
थोडं चित्रपटाव्यतिरिक्त सांगतो, हा माधव ना माझ्यासारख्या गाव सोडून फक्त शिक्षण आणि नोकरीसाठी येवढ्या लांब शहरात आलेल्या प्रत्येकाला कनेक्ट करतो. प्रत्येकाला वाटतं आपण जे शिक्षण घेतलं, त्याचा उपोयोग आपल्याला गावासाठी, आपल्या माणसांसाठी करता यावा. पण तसं शक्य होत नाही. थकलेल्या आईवडिलांना भरल्या डोळ्यांनी निरोप देत शहराची वाट धरावीच लागते. म्हातारपणी आई वडिलांचा आधार व्हायचं, त्यांची काळजी घ्यायची सोडून गावाकडून शहरात आलेल्या मुलांना पाहिजे तेव्हा आई वडिलांची भेट घडणं सुद्धा अशक्य होतं.
आपली नैसर्गिक संपत्ती जपता आली पाहिजे…
कोकणातल्या लोकांनी खूप काही जपलं आहे. संस्कृती, निसर्ग, कला आणि बरंच काही. ते जपण्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते. मी वर म्हटल्याप्रमाणं आपल्या विदर्भ, मराठवाड्याच्या भागात फार नैसर्गिक संपत्ता आहे. अशातला भाग नाही. पण आपल्या जमिनी, कोरडवाहू असो की ओलिताची, पिकाऊ असो की नापीक असो, एका गुंठा असो बक्कळ असो, कशीही असली तरी ती आपली जमीन आहे आणि तिला जपण्याची जबाबदारी पण आपली आहे. मग असं असताना पिकत नाही म्हणून देऊन द्या महामार्गात, जाऊद्या शेतातून रेल्वे पैसा येईल. ही भावना खूप चुकीची आहे. पुण्यासारख्या काही भागात गुन्हेगारी वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्यांच्या जमिनी विकल्या. एकदा का जमीन गेली की माणसाचं राहतं मातीशी राहत नाही आणि माणूस जमिनीशी जोडलेला नसला की तो माणसालातला माणूस राहत नाही. त्यामुळे जपायला हवं.
चित्रपाटविषयी तर तुम्हाला अनेक समीक्षक सांगतिलच पण कोकणी माणूस सोडून वऱ्हाडी आणि मराठवाडी माणसाला विचार करायला लावणाऱ्या या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे चित्रपट नक्की बघा…