
आजकाल पहिले सारखं वाचनच होत नाही रे, वेळ कुठे मिळतो. पुस्तकं तर खूप घेऊन ठेवली आहे. पण वाचणार कधी? तुमच्या माझ्यासारखी अशीच प्रश्न अनेकांना पडतात. पण काही फक्त विचार करतात आणि सोडून देतात तर काही जण मात्र त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला शंतनू नायडू, गार्गी सांडू आणि त्यांच्या मित्रांनी, अन् सुरु झाली एक चळवळ “मुंबई बुकीज ”
“मुंबई बुकीज ” काय आहे ?
माझ्या भाषेत सांगायचं झाल्यास “वाचकांनी वाचकांसाठी सुरु केलेली चळवळ म्हणजे मुंबई बुकीज “ नाही कळालं, थांबा सांगतो. वाचना संदर्भात आपल्याला वर सांगितल्याप्रमानं अडचणी यायच्या त्या शंतनू आणि गार्गीला देखील आल्या, मग त्यातूनच त्यांना सुचली एक भन्नाट कल्पना. म्हणजे वाचणासाठी वेळ मिळत नाही, तो काढावा लागतो. वाचन करायला मनासारखी जागा मिळत नाही, ती शोधावी लागते. मग या तरुणांनी तेच केलं. आठवड्यातून दोन दिवस शनिवार आणि रविवार सकाळी ८ ते १० अशी एक वेळ वाचनासाठी ठरवली. यावेळेत सगळे मित्रमैत्रीनी एका ठरावीक जागेवर एकत्र येऊन वाचू लागले. त्याच चळवळीला नाव दिलं “मुंबई बुकीज”
मुंबई बुकीजला मिळाला कमाल प्रतिसाद…
शंतनू आणि गार्गी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले तरुणांना वाचायचं होतं. पण आमच्या सारख्या अनेक अडचणी त्यांना होत्या. मग आम्ही आमच्या सारख्या वाचणाची इच्छा असणाऱ्या जोडून घेऊ लागलो. सुरुवातीला संख्या फार कमी असायची. पण आम्ही जमू लागलो. हवं ते वाचू लागलो. बघताबघता आता अनेक तरुण या उपक्रमात जोडले गेले आहे. तरुणांची संख्या जास्त असली तरी, १०-१५ वर्षांची मुलं आणि ७०-८० वर्षांचे आजी-आजोबा देखील या उपक्रमाचा भाग आहेत. आता जवळजवळ ३०० ते ३५० लोक एकत्र येत, छान निसर्गाच्या सानिध्यात वाचन करत असतात.
मुंबई बुकीजशी कसं जोडलं जायचं?
ही चळवळ फक्त मुंबई पुरती मर्यादीत राहिली नसून, पुणे, जयपूर आणि बंगलोरमध्ये देखील हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या चारही शहरात वाचकांचा चांगला प्रतिसाद पहायला मिळतो आहे. जर या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल, तर mumbaibookies या त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डलला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता आणि वाचकांसाठी असलेल्या या भन्नाट उपक्रमात सहभागी होऊ शकता.