
तिची कमाल आहे. भांड्यावर फिरवणारे हात, ती किबोर्डवर फिरवायला लागली आणि जग प्रगतीच्या वाटेवर घेऊन गेली. घरातलं आर्थिक नियोजन करणारी आई आणि देशाची तिजोरी सांभाळणारी निर्मला ताई पाहिली, की वाटतं तिची कमाल आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणाऱ्या सोफिया आणि व्योमिका ताईला पाहिलं की वाटतं , तिची कमाल आहे. छोटं बाळ उराशी बांधून शेत निंदायला जाणारी बाई असो किंवा बॅग पोटावर घेऊन लाखोंच्या गर्दीत चढणारी ताई असो, त्यांना पाहिलं की वाटतं, तिची कमाल आहे. ताई संस्कृती म्हणून राखी नक्कीच बांध मला, पण एक लक्षात ठेव तुझ्या रक्षणाला तू समर्थ आहे.
मला ना खरंच खूप कौतुक वाटतं, घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळणाऱ्या तायांचं. माहिती नाही रक्षाबंधणाची ही संस्कृती केव्हापासून सुरू झाली. पण तिचं रक्षण करण्याची गरज कुठे आहे आपल्याला?, म्हणजे पत्रकारीतेचं क्षेत्र एवढं अनियमिततेचं आहे. पण न्यूजरूममध्ये असो किंवा फिल्डवर आज असंख्य स्त्रिया या क्षेत्रात तग धरून आहेत. या व्ययावस्थेशी भिडतायत, समाज चुकत असेल तर प्रश्न विचारतायत, काही वृत्तवाहिण्यांच्या प्रमुख आज स्त्रिया आहे. प्रत्येक क्षेत्रात आज त्या पुढे आहेत. मग प्रश्न पडतो, देशाचं पण संरक्षण करणाऱ्या त्या स्त्रियांना कोणाच्या संरक्षणाची गरज आहे?. आपण आपलं उगाच हात पुढे करून राखी बांधून घेतो आणि मी तुझं रक्षण करणार म्हणून पुरुषी माज दाखवतो. म्हणूनच म्हणतो तू राखी बांध पण तुझं रक्षण करण्यास तू समर्थ आहेस, हे कायम लक्षात ठेव.
-विनय महाजन