सरकारला वाचनवेड संपवायचं आहे का?

मजायला लागलं तेव्हापासून घरात नियमित वृत्तपत्र यायचा. बाबा, दादा न चुकता वृत्तपत्र चाळायचे, सगळ्यांचं वाचून झालं, की मग दुपारी सगळी कामं झाल्यावर आई ते वृत्तपत्र हातात घेणार आणि मुख्य पान, संपादकीय पान आणि राजकारणाला फाट्यावर मारून थेट शब्दकोडं सोडवायला घ्यायची. त्यानंतर भाजी निवडायला ती वृत्तपत्राचा वापर करणार, डब्यांच्या रॅकमध्ये टाकायला वृत्तपत्राचा वापर होणार. एवढंच काय साधं झुरळ मारायचं असलं तरी वृत्तपत्र कामात यायचं. आता ई-पेपर वाचणारे काय टॅबनं झुरळं मारत असतील का? हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे. 

असो, हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे सामान्य प्रशासन विभागानं घेतलेला निर्णय. या निर्णयानुसार मुख्यमंत्री वगळता इतर मंत्र्यांच्या कार्यालयात १ सप्टेंबरपासून छापील वृत्तपत्र जाणार नाहीत. आता नको तिथं, नको तेवढी उधळपट्टी करणाऱ्या सरकारला हा वृत्तपत्रांचा खर्च वाचवून काय साध्य करायचं असेल देव जाणे. आधीच तरुणांचं किंवा ऐकंदरीत सगळ्यांतं वाचन वेड कमी होत चाललेलं असताना हे असे निर्णय का? अर्थात मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर निर्णय मागे घेण्यात आला. पण असे निर्णय घेतलेच का जातात?  वृत्तपत्र वाचनानं माणसाच्या विचारात स्पष्टता येते. मी स्वतः जरी इलेक्ट्रॉनिक्स मीडियात काम करत असलो. तरी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रातली बातमी वाचल्या शिवाय समाधान होत नाही. पण माझ्या पिढीतली मुलं किती प्रमाणात वृत्तपत्र वाचतात हा प्रश्नच…कारण वृत्तपत्र वाचनाची सवय ही लहानपणापासूनच लागत असते. घरात बाबा,दादा वरचेवर सागायचे तेव्हा कुठं मागच्या पानापासून वृत्तपत्र वाचनाची सुरुवात झाली. क्रीडा पानापासून संपादकीय पान समजण्यासाठी बरीच वर्ष लागली.

आता नव्या पिढीलाही वृत्तपत्र वाचनाची सवय लावणयाची गरज असताना, त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असताना, सरकारचं असं वागणं कितपत योग्य आहे? याउलट सगळ्या शाळांमध्ये मुलासांठी वृत्तपत्र ठेवावी. पूर्वी वृत्तपत्रांमध्ये मुलांसाठी विशेष पान होतं. कूपन जमा करणे अशा विविध कृती केल्या जायच्या, जर मुलांमध्ये पुन्हा वाचनाची आवड निर्माण झाली. तर त्यांच्या विचारांना चालना मिळेल. आताची पिढी वाचत नाही अशातला भाग नाही. मात्र वाचनाचे विषय, पद्धती, माध्यमं सगळंच बदललं आहे. पण कितीही टेक्नॉलॉजी पुढे गेली तरी पारंपरिक ते पारंपरिक असतं. कारण फक्त ५ रुपयांना मिळणारं वृत्तपत्र, घरात विविध ठिकाणी कामी येतं.  

– विनय महाजन


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *