
“लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.”
सुरेश भटांच्या या ओळी वाचल्या की आपली भाषा मराठी आहे. आपण मराठी बोलतो, आपण मराठी जगतो हे आठवून वेगळीच श्रीमंती येते. एक भाषा तिच्या वऱ्हाडी, अहिराणी, मालवणी आणि अशा कितीतरी उपभाषा, केवढा समृद्ध वारसा आहे आपला. पण जेवढी घरात संपत्ती तेवढा मुलांमध्ये वाद अधिक, असं असतच. महाराष्ट्रात सगळ्यांची भाषा एकच असली तरी गाव बदलं की ती बोलण्याची पद्धत बदलत जाते. आणि आपल्या त्या गावाकडच्या बोलण्याच्या पद्धतीची आपल्याला मुंबई, पुण्यात आलं की लाज वाटू लागते.
मी पहिलेपासूनच ठरवलं होतं. मला मराठी माध्यमांमध्येच पत्रकारिता करायची. कारण माझा एक समज होता. आपण आपल्या भाषेत जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकू, पण जसजस काम करायला लागलो तशी एक गोष्ट लक्षात आली. माध्यमांची भाषा ही आपली भाषाच नाही. अनेक शब्दांचा फरक आहे. मग बातमी लिहिताना चुकल्यावर, आपण लिहिलेल्या शब्दांवर कोणी बोललं, कोणी हसलं की वाईट वाटायचं. एक न्यूनगंड यायचा मनात.
पण प्रसिद्ध लेखक अरविंद जगतापांचं एक वाक्य आहे. “कुठलीच भाषा शुद्ध अशुद्ध नसते, आपण बोलतो ती आपल्या आईची भाषा, मग आपली आई अशुद्ध कशी बोलेन?” भाषा ही शुद्ध नसते, फार फार तर ती प्रमाण आणि बोली अशी विभागली जाऊ शकते. त्यानंतर माझा भाषेचा न्यूनगंड बऱ्या पैकी गेला. माध्यमात काम करतो म्हणून मी लिहिताना कोथिंबीर लिहिणार, पण माझ्या विदर्भात सांबार म्हणतात तर मी सांबारच म्हणणार. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, खान्देशातील मुलांनी बिंदास्त या क्षेत्रात यावं, वेळ पडेल तशी प्रमाण भाषा लिहावी, गरज आहे तसा त्या-त्या शहरातील शब्दांचा वापर करावा. पण मनात कुठलाही न्यूनगंड न ठेवता बोलावी ती आपलीच बोली भाषा, ते पण अभिमानानं!
– विनय महाजन