डी-मार्ट, इज नॉट गुड फॉर माय हार्ट!!!

चार ते पाच आदिमानव सोबत राहत असतात. मिळले ते खातात, वाटेल तसं जगतात कोणी अडवणारं नसतं, ना कोणी विचारणारं नाही. मग एक दिवस त्यांना आठवतं, आपल्याला मिळणारा आहार हा योग्य नसून तुकाराम मुंढे साहेबांचा तिसरा डोळा उघडणारा आहे. म्हणून हे आदिमानव स्वतःचा आहार स्वतः  तयार करायचं ठरवतात. मग आगीचा शोध लावण्यापासून तयारी सुरू होते. कारण गॅस संपलेला असतो, घरात आवश्यक ते सामान नसतं. बरं ही आदिमानव दुसरं तिसरं कोणी नसून मुंबई, पुण्यात राहणारी बॅचलर पोरं आहेत. मग सामान नसल्याची जाणीव झाल्यावर डी-मार्ट गाठावं लागतं. अन् डी-मार्ट, इज नॉट गुड फॉर माय हार्ट !!!

कारण फक्त १ किलो तांदूळ, १ किलो डाळ आणि थोडे मसाले एवढचं उद्देश घेऊन गुफेतून निघालेले आदिमानव डी-मार्टला पोहोचताच कधी अलीबाबाचे चोर होऊन सगळं डी-मार्ट आपल्याला लुटायचं हा हेतू घेऊन तिथे वावरू लागतात कळतचं नाही. आता आमचंच बघा खिचडीचं सामान घ्यायला गेलेलो आम्ही, अख्खा संसार घेऊन आलो. असो किराणा सेक्शनपासून सुरू झाली होती अलिबाबाच्या चोरांची लूट. तांदूळ घ्यायला गेल्यावर आठवलं अरेच्चा आपल्या गुफेत(बॅचलर पोरांच्या फ्लॅटला गुफा म्हणू शकतो) साखरच नाही. म्हणून दोन किलो साखर घेतली. आता साखर तर घेतली, पण नुसत्या साखरेचा चहा थोडीच होतो. म्हणून १ किलो चहापत्ती घेतली. आता चहा तर झाला पण नुसता चहा कसा प्यायचा सोबत बिस्किट तर लागतील ना राव. असो चहा बिस्किट म्हणजे कधीकधी तर आम्हा आदिमानवांचं छप्पन भोगासमान जेवन असतं. बरं यात जीवनदायीनी मॅगीला विसरून कसं चालेल. “मोsssss ठ्ठ पॅकेट घे रे”    

मग थोडं पुढं आल्यावर एक फारच सुगंधीत एरिया आम्हाला दिसला. त्या एरियात गेल्यावर आदिमानवांना आठवलं रोज अंघोळ करणं ही टर्म अजून अस्तित्वात यायची आहे. त्यामुळे आपल्याला उत्तम दर्जाचं आंघोळीचं औषध म्हणजे पर्फ्युम लागेल. मग ते घ्या आपल्या झोळीत. अशा तऱ्हेनं आम्ही प्रत्येक सेक्शनमधून काहीना काही घेत सगळ्यांचा मान ठेवला.

बरं आता अलीबाबाचे चोर सगळं लुटून निघणारंच तेवढ्यात आठवलं

चोर १ः- “दोन चार कपडे कमीच पडायले, घ्याव का?”  

चोर २ः- आपण आपल्या गुफेत (बॅचलर मुलांच्या फ्लॅटला तुम्ही गुफा म्हणू शकता) राहतो म्हणून काय झालं. विवस्त्र फिरू शकू एवढेही आपण आदिमानव नाहीय.

मग काय लूटच लूट

आता आपलं आवडतं सेक्शन स्टेशनरी

आता पेनाचाही फार वापर करत नाही. पेन्सील म्हटलं की तर फक्त थ्री इडियट्समधल्या डायलॉगपुरतीच आठवते. खोडरबर, शापनर हे सगळे आयुष्यातून कधी गेले कळलंच नाही. पण आजही या सेक्शनमध्ये यायला भारी वाटतं. तिथले महागातले कंपासबॉक्स पाहिले की शाळेत तो एक तसला भारीचा कंपासबॉक्स घेऊन हवा करणारा मुलगा आठवतो. Geometry Box पाहिला की गणिताचे मास्तर आठवतात. ती चित्रकलेची वही, दप्तर आणि स्टिकी नोट्स वैगरे सारखे आता नवे आलेले अॅटम पहायला अजूनच भारी वाटतं. पण या सेक्शनमधून आम्ही फक्त आणि फक्त आठवणी लुटल्या. तर अशा प्रकारे अलीबाबाच्या चोरांची लूट पूर्ण होते

पण आता काऊंटरवर आल्यावर या चोरांना लक्षात येतं. की जोपर्यंत आयुष्यात अली ‘बाबा’ पैसे देत होते. तोपर्यंतच आयुष्यात लुटीची मजा होती. आता आपल्याला पैसे द्यावे लागणार हे त्यांच्या लक्षात आलं आणि हाती आलं बेजटपेक्षा खूपच जास्त बील, तेव्हा छातीत अशी कळ आली, अशी कळ आली, जाऊद्या आता काय सांगू. पण मग तेव्हा बील पाहून कळालं “डी-मार्ट, इज नॉट गुड फॉर माय हार्ट!!!”

– विनय महाजन

हेच ते तीन आदिमानव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *