गूँगी गुडियानं बोलतं व्हावं…

काँग्रेसनं राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना “गूँगी गुडिया” म्हणून संबोधलं. अन् राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या ते म्हणाला लागलं. मग सुरू झाली शहराशहरात आंदोलनं, घोषणाबाजी आणि माफिनाम्याची मागणी. अजितदादांना जाऊन सहा महिनेच झाले, सुनेत्रावहिनींना सक्रिय राजकारणात उतरून अवघे काही महिने झाले मग काँग्रेस अशी टीका करूच कसकाय शकतं असा राग देखील अनेकांनी व्यक्त केला आहे. पण राग याचा यायला हवा एका स्त्रीचा असा अपमान केलाच कसा जातो? पण या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होतात.

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्त्रीया आल्या, पण स्वकर्तृत्वावर स्वतःचा ठसा उमटवू शकल्या अशा किती जणी होत्या. महापौरांसाठी, नगराध्यक्षपदासाठी, सरपंचांसाठी जागा राखीव असतात. पण त्या जागांवर स्वतःहून राजकारणात आलेल्या किती महिला असतात. स्त्री शिक्षणाची क्रांती झालेल्या महाराष्ट्राला अजूनही सक्षम महिला नेतृत्व न लाभणं हे विचार करण्यासारखं आहे. पश्चिम बंगालचं राजकारण ममता बॅनर्जींभोवती फिरतं, तामिळनाडू राजकारण कधीकाळी जयललीतांभोवती फिरायचं, देशाच्या राजकारणाला तर इंदिरा गांधींनी नवी दिशाच दिली आहे. बरं विशेष म्हणजे याच इंदिरा गांधींसाठी गूँगी गुडिया हा शब्दप्रयोग करण्यात आला होता. पण त्यानंतर एक काळ असा आला की राजकारणात फक्त आणि फक्त इंदिरा गांधींच बोलत होत्या.  

असो हा भाग वेगळा, पण महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत सगळ्या गूँगी गुडियाच आल्या, यामागचं कारण म्हणजे विधानसभेत किंवा विधानपरिषेदत एखाद्या महिला मंत्र्याचं किंवा आमदाराचं गाजलेलं भाषण आठवतं का? मृणालताई गोरे, प्रतिभाताई पाटील एक दोन असे नावं सोडले तर आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांच फारसं अस्तित्व दिसणार नाही. कारण अजूनही महाराष्ट्रातील काही भागात महिलांच्या डोक्यावर पदक आहे. अजूनही अनेक घरात गृहिणीच्या रुपात गूँगी गुडिया आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही. अन् जर महिलांना गूँगी गुडिया बनून रहायचं नसेल तर लाडक्या बहिणींसारख्या योजनेचे पैसे घेऊन मतदान करण बंद करायला हवं.

-विनय महाजन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *