बापटांची चापट!

विद्यानंद बापट, पुणे

पुणे विद्येचं माहेर घर, असं म्हणतात पुण्यानं देशाला दिशा दाखवली. अहो एवढंच काय, काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव, त्याला सार्वजनिक स्वरुप देण्यातही एका पुणेकराचाच हातभार. पण यावर्षी ना बाप्पा येण्याआधीच पुण्याचा गणेशोत्सव चर्चेत आला आहे. गणेशोत्सवावरून दोन गट निर्माण झाले आहे. त्याचं झालं असं, वरील फोटोत दिसणारे गृहस्थ आहेत विद्यानंद बापट. ते स्वतःला हाडाचे नास्तिक असल्याचं सांगतात. त्यांनी पुण्यात होणाऱ्या गणेशोत्सवाला विरोध केलाय. पण नास्तिक असणाऱ्या या बापटांनी मूर्ती पूजेला अजिबात विरोध केला नाही. अन् इथंच भल्या भल्यांची पंचाईत झाली. त्यांनी विरोध केला गणपतीच्या आणि उंदीमामाच्याही आधी येणाऱ्या डी.जेला, होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला, बापटांचा पारंपरिक वाद्यांनाही विरोध आहे बरं, बापट म्हणतात ध्वनी प्रदूषण अजिबात नको.

आता मला सांगा, बापटांचीही बुद्धीजीवी मागणी सुसंस्कृत पुण्यातील नागरिकांना कशी पटेल. बरं विद्यानंदरावांचं विशेष कौतुक यासाठी वाटतं, ते फक्त प्रॉब्लेम समोर घेऊन आलेले नाहीत. तर त्यासोबत प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन देखील घेऊन आलेले आहेत. म्हणजे पेठांमधून मिरवणूक निघाल्यावर त्रास होतो. मग बापट म्हणतात हायवेवरून काढा, एखादी लेन पकडा आणि तिकडे तुमचा धिंगाना घाला. बरं असं व्यवस्थित दिलेलं सोल्युशन लोकांना कसं पटेल. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणतात “विद्याधर बापटांना कुत्रही विचारत नाही”, आता त्यांच्या या वक्तव्याला बापटांनी भीक घालूच नाही कारण त्यांना, त्यांच्या विचाराला आता लोक विचारू लागली आहेत. बरं सोशल मीडियावर बापटांची प्रचंड हवा आहे. तरुणही मोठा पाठिंबा देत आहेत. अभिजीत दिपकेंना हलक्यात घेण्याची चूक एकदा भाजपनी केली आहे. तीच चूक मंडळांच्या गणेशभक्तांची नव्हे तर उडाणटप्पू मुलांची मतं मिळवण्यासाठी भाजप बापटांना हलक्यात घेऊन करतंय. बाकी या विद्यानंदरावांना सोशल मीडियावर मराठीचे शशी थरुर ही उपाधी मिळाली आहे. त्यांची मुद्दे मांडण्याची आणि बोलण्याची पद्धात खरंच खूप प्रभावी आहे. तुम्हाल काय वाटतं, तुमचे कान सुरक्षीत रहायला हवे की नाही?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *