
नाना, आजोबांना नाना म्हटलं जातं. आणि नाना माझ्या आजोबांच्या वयाचे, ज्यांनी माझ्या वडिलांच्या आणि माझ्या पिढीलाही तेवढंच प्रेम दिलं. नाना तुम्हाला कधी भेटलो नाही. पण पत्रकारितेत आल्यापासून तुम्हाला भेटणाऱ्या अनेकांकडून तुमच्याबद्दल भरभरून ऐकलं. नाना तुमचे अनेक चित्रपट पाहिले. एक ‘नट’ म्हणून तुम्ही ‘सम्राट’ होताच, पण माणूस म्हणून तुम्ही चक्रवर्ती सम्राट होता. आणि म्हणूनच नाना, आम्हाला तुमच्यासारखं जगायचं आहे. भरभरून!
राजकारण्यांना म्हणजे चक्क मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना “आमच्या मताची काहीच किंमत नाही का?” असं विचारण्याची हिंमत नानांमध्ये होती. घरी आलेल्या पाहुण्यांना आपल्या हातानं जेवू घालण्याचं प्रेम नानांमध्ये होतं. एका पत्रकार मैत्रिणीनं सांगितलं, “नानाची मुलाखात घ्यायला गेले, खूप दडपण होतं. पण मुलाखतीच्या आधी नानांसोबत संवाद झाला आणि ते ‘आपला माणूस’ वाटू लागले.” नाना तुम्ही सोशल मीडियावर फार सक्रिय नव्हता, पण तुम्हाला सांगतो, एवढे सीनेमे येऊनही अजूनही तुमच्याच चित्रपटातील मिम्स ट्रेंडिंगला असतात. मग तुम्ही आम्हाला आपलेसे वाटणारच ना, नाना तुम्ही शेतकऱ्यांचे हिरो होतात. जळगावातील एका शेतकऱ्याला फासावरून माघारी आणल्याचं कुठे तरी वाचण्यात आलं होतं. नाना शेतकऱ्यांना लुबाडून मोठं होणारे अनेक आहेत. पण शेतकऱ्यांना मोठं करणारे तुमच्यासारखे खूप कमी असतात. हाय बजेट सीनेमाच्या प्रमोशनलाही सदरा, पायजमा आणि गळ्यात उपरणं घालून जाणारा माणूस शेतकऱ्यांना आपला हिरो वाटणारच ना, नाना.
शेतकऱ्यांना, ग्रामीण महाराष्ट्राला एवढं भरभरून दिलं तुम्ही, मग आधीच दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना आणखी त्यात भर घालावी असं का वाटलं तुम्हाला. बरं आता गेलाच आहात, तर तुमचा तो अजित, त्याच्या गालावरची लाली अजूनही तशीच आहे का बघा, आणि सांगा त्याला आता या महाराष्ट्रात शेतकऱ्याला वाली नाही राहिला ते. नाना आता जरी तुम्ही आमच्यात नसला, तरी तुमरा ‘नाम’ हमेशा रहेगा नाना…