
१९६६ मराठी माणसाला स्वाभिमानानं जगायला शिकायला लावणारं वर्ष, कारण यावर्षीच स्थापना झाली, बाळासाबेबांच्या शिवसेनेची. बाळासाहेबांची शिवसेना फक्त यासाठी म्हणतोय कारण आताची शिवसेना आणि तेव्हाची यात जमीन आस्मानाचा फरक आहे.
बाळासाहेब असताना शिवसेनेनं अनेक आंदोलनं केली. ती सगळी आंदोलनं आर या पारची होती.
१. स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठीचं आंदोलन (१९६६ नंतर)
२. महागाईविरोधी विशाल आंदोलन (१९७३)
३. पांढरपेशा कामगारांचे संघटन आणि स्थानीक लोकाधिकार समिती (१९७४)
४. नामांतर लढा आणि समर्थन (औरंगाबाद/संभाजीनगर – १९८८)
५. कृषी आणि वीज बिलांसंबंधीची आंदोलने (१९८६ ग्रामीण विस्तार काळ)
बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने घेतलेली आंदोलनाची शैली नेहमीच आक्रमक आणि थेट रस्त्यावर उतरणारी राहिली. सुरुवातीला मराठी माणसाचा अधिकार आणि कामगारांचे प्रश्न, आणि नंतर हिंदुत्वाचा मुद्दा यावर केलेली आंदोलनं पक्षाला सत्तेच्या उंबरठ्यापर्यंत (१९९५ मधील युती सरकार) पोहोचवण्यात अत्यंत यशस्वी ठरली.
पण बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेना कुठेतरी मवाळ झाली. आंदोलनाला आर या पारचं स्वरूप देणारी शिवसेना शांत झाल्याचं बोललं जाऊ लागलं होतं. कधीकाळी देशातील महत्त्वाचे नेते मातोश्रीच्या पायऱ्या झिजवायचे. त्याच मातोश्रीत मोठे झालेले उद्धव ठाकरेंनी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या मंचावर जाऊन पाठिंबा देणं आश्चर्याचं होतं. कधीकाळी बाळासाहेबांनी आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणजे सरकारला झुकायला लागायचं. हे समिकरण जपाणाऱ्या बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनातून जमलेल्या जनतेला संबोधित करण्यासाठी भरसभेतून अभिजीत दिपकेंना फोन लावतात, तेव्हा ठाकरी बाण्यावर प्रश्न निर्माण केला जातो.
पण हा ठाकरी बाणा काहीसा राज ठाकरेंनी जपला होता. त्रिभाषा सूत्राविरोधात आवाज उठवल्यावर स्वतः शिक्षण मंत्र्यांना राज ठाकरेंच्या घरी जाऊन स्पष्टीकरण द्यावं लागणं म्हणजे ठाकरेंच्या शिल्लक असलेल्या ताकदिचा पुरावा आहे.
पण आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे, मनसे आणि ठाकरेंच्या सेनेनं आज केलेलं आंदोलन. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र आंदोलनाआधीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. मग त्यांच्या सुटकेसाठी मैदानाच उतरली ठाकरेंची युवा पिढी. या आंदोलनातून ठाकरेंची युवा पिढी मूळ रुपात म्हणजे रस्त्यावरच्या आंदोलनात पहायला मिळाली. आदित्य आणि अमित ठाकरेंसोबत तेजस ठाकरे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. आदित्य ठाकरेंनी पोलिसांच्या बसवर चढून आंदोलकांना सोडण्याची केलेली मागणी असो किंवा अमित ठाकरेंनी पोलिसांना खडसावत दिलेला ठिय्या. ठाकरेंची ताकद जिवंत असल्याचा पुरावा आहे. पण फरक एकच होता यावेळी गर्दी ठाकरेंमुळे नाही तर गर्दीमुळे ठाकरे जमले होते. पण मुंबईत ठाकरेंची आणि पुण्यात पवारांची तिसरी पिढी तरुणांसाठी सोन्याचा चमचा बाजूला ठेऊन रस्त्यावर उतरते आहे. हे चित्र नक्कीच आशादायी आहे.